ग्राम आधार स्वयंसेवी संस्था चिपळूण ही संस्था शोषित ,वंचित शेतकरी ,कष्टकरी, दुर्बल घटक, दिव्यांग, मतिमंद यांना केंद्रबिंदू ठेवून त्यांच्या आरोग्याचे, शिक्षणाचे, रोजगाराचे प्रश्न सोडवण्याचे काम करते. दुर्बल घटकांना त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी लोकसहभागातून मदत करते . वंचितांचा उद्धार, ग्रामीण जनतेचा उद्धार हेच संस्थेचे ब्रीद आहे.
सांस्कृतिक ,सामाजिक, क्रीडा ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांची निर्मिती ,दिव्यांगांसाठी शाश्वत रोजगार असे समाजाभिमुख प्रश्न सोडवण्याचा हेतूने ग्राम आधार संस्थेने अविरत सेवेचा अखंड वसा घेतला आहे.
कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यामध्ये संस्थेने आपले सामाजिक सेवेचे योगदान सातत्यपूर्ण चालू ठेवलेले आहे. विशेषतः गुहागर तालुक्यामध्ये मतिमंद मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनाचा प्रश्न फार मोठा गंभीर होता असे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना ज्यावेळेला जाणवले होते त्यावेळी त्यांनी गुहागर तालुका नजरेसमोर ठेवून दिव्यांगांसाठी काम करण्याची तयारी दर्शवली होती कारण गुहागर तालुक्याचा विकास त्यावेळेस म्हणावा तेवढा झालेला नव्हता. गुहागर तालुक्या मध्ये नोंदणीकृत दीडशेहून अधिक मतिमंद मुले असल्याचे संस्थेला आढळून आले होते. व ही मुले ० ते २३ वयोगटातील असल्याचे संस्थेच्या सर्वेक्षणातून समोर आले होते. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मतिमंदांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी खेड, रत्नागिरी, चिपळूण येथे शाळा होत्या परंतु गुहागर तालुक्यामध्ये अशा प्रकारची कोणतीही सुविधा नसल्याचे यावेळी संस्थेच्या लक्षात आले होते. संस्थेच्या वतीने घेतल्या गेलेल्या सर्वेक्षणावेळी विद्यार्थ्यांच्या शिक्षण व पुनर्वसनाच्या कामात हेळसांड झाल्याचे पालकांच्या बोलण्यातून दिसून आले होते. ग्रामीण भागातील पालकांच्या व्यथा समोर आल्या व यातूनच ग्राम आधार स्वयंसेवी संस्थेने मतिमंद मुलांच्या शिक्षण व पुनर्वसनासाठी गुहागर तालुक्यात प्रामुख्याने दिशादर्शक ठरेल असे काम करण्याचा निर्णय घेतला होता व शृंगारतळी येथे तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी मतिमंद मुलांसाठीचे पहिले शिक्षण तथा विकास केंद्र सुरू करण्यात आले.
पहील्याच वर्षी या शिक्षण केंद्रामध्ये साधारणतः 60 विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्यात संस्थेला यश लाभले होते.
तालुक्यात दूरवर पसरलेल्या मुलांना या शिक्षण केंद्राशी जोडणे दळणवळणाच्या अपुऱ्या साधनांमुळे शक्य नव्हते. तरीही न डगमगता सातत्यपूर्ण प्रयत्नातून पालकांचे विचार परिवर्तित करून संस्थेने जीवन ज्योती विशेष शाळा लोकाश्रयातून व सेवाभावी व्यक्तींच्या सहाय्यातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत नावा रुपाला आणली. शाळेसाठी सेवक वर्ग संस्थेने उपलब्ध करून दिला.
शाळा विस्तारासाठी व शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी लागणारे सर्व साहित्य समाजातील दानशूर व्यक्तींच्या दानातून, देणग्यातून, वर्गण्यातून उभे राहिले.
विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना दाखल करून घेणेकामी पालकांचे समुपदेशनही तेवढेच महत्त्वाचे ठरते या दृष्टीने मानसोपचार तज्ञ डॉक्टर श्रुतिका कोतकुंडे, डॉक्टर लीना पाटील ,निनाद डाकवे यांचे योगदानही महत्त्वाचे ठरले .
राष्ट्रीय मानसिक विकलांग क्षेत्रीय संस्था नवी मुंबई यांच्या सहकार्याने संस्थेमध्ये बुद्ध्यांक चाचणी शिबिर व पालकांचे समुपदेशन शिबिर घेण्यात आले होते.
ग्रामआधार स्वयंसेवी संस्था दिव्यांग व मतिमंद मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध असून यासाठी संस्थेमार्फत शाळेमध्ये रक्षाबंधन, दहीकाला, उत्सव, वृक्षारोपण, गणेशोत्सव, खेळाच्या विविध स्पर्धा वाद्य वृंदांचे प्रशिक्षण, वनभोजन, शैक्षणिक सहल ,योग प्रशिक्षण असे विविध कार्यक्रम राबवले जातात.
या शाळेला विविध स्तरातील नामवंत व प्रतिष्ठित मान्यवर नेहमी भेट देत असतात. डॉक्टर अनिल काकोडकर ,जलतज्ञ डॉक्टर माधवराव चितळे, केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू ,माजी केंद्रीय मंत्री अनंत गीते ,राज्याचे माजी सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले ,राष्ट्रीय भटक्या विमुक्त आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनीही संस्थेला शुभेच्छा दिलेल्या आहेत.
ग्रामआधार संस्था अत्यंत विशाल दृष्टिकोन ठेवून सामाजिक हेतूने प्रेरित होऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध आहे. या संस्थेच्या कामकाजामध्ये दिवंगत
पेडणेकरजी मोठ्या उत्साहाने सहभाग घेत असत. या संस्थेची मुहूर्तमेढ त्यांच्याच दूरदृष्टीकोनातून रोवली गेली होती. त्यांच्या पश्चात ग्राम आधारची सर्व टीम व त्यांचे चिरंजीव अजिंक्य संस्थेचा कार्यभार अत्यंत सचोटीने व हिमतीने करत आहेत. विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती व्हावी यासाठी व दिव्यांग विद्यार्थी भविष्यात आत्मनिर्भर व्हावेत म्हणून संस्थेमार्फत विशेष कार्यशाळा व उद्योग केंद्र ही चालवले जाते.
Product Order / Enquiry
Your product purchase interest motivates our special student